छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : म्हैसमाळ यात्रेनिमित्त कंदुरी कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबीयांचा टेंपो उलटून झालेल्या अपघातात दहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. ३१) दुपारी दौलताबाद घाटात झाला.
तुर्काबाद खराडी येथील मोरे कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक ४०७ टेंपो (एमएच १४ एएच २३९१) मधून दौलताबादमार्गे म्हैसमाळकडे जात होते. घाटातील मोठ्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेंपो वळणावर उलटला. या अपघातात सोनाली पवार, सुमन मोरे, मुन्ना बोर्डे, पायल पवार, रोहन पवार, शिवदास पवार, संजय माळी, विष्णू पवार, संजय पवार हे जखमी झाले. जखमींना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप वाघ यांच्यासह साहेबराव राठोड, रावसाहेब ठिल्लारे, राजेश पाटील आणि अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक सुरळीत करत जखमींना रुग्णालयात पाठवले. यात्रेनिमित्त रविवारी कंदुरीचा कार्यक्रम असल्याने सदर कुटुंबीय म्हैसमाळ येथे मुक्कामी जात असताना हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.











